भुसावळमधील १४ हजार ५५७ मतदारांच्या नावांवर हरकती; मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्याची मागणी
एसआयआर प्रक्रियेत फॉर्म क्रमांक ७ चा कथित गैरवापर झाल्याचा आरोप; प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन, चौकशीची मागणी
भुसावळ | प्रतिनिधी – प्रमोद पाटील
भुसावळ शहरातील मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान तब्बल १४ हजार ५५७ मतदारांच्या नावांवर हरकत घेण्यात आल्याचा मुद्दा समोर आला आहे. मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म क्रमांक ७ चा कथित बेकायदेशीर वापर करून रिकामे अर्ज दाखल करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
फॉर्म क्रमांक ७ च्या वापराबाबत गंभीर तक्रार
आज भुसावळ प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन मतदार यादीसंदर्भातील तक्रार व निवेदन सादर करण्यात आले. एसआयआर प्रक्रियेदरम्यान १४ हजार ५५७ मतदारांच्या नावांवर हरकती नोंदविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच रिकामे अर्ज दाखल करून फॉर्म क्रमांक ७ चा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जन्मापासून भुसावळ शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या नावांवरही हरकत घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाच्या हक्कासाठी कुणाकडे दाद मागायची, असा सवाल निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
पात्र मतदारांचे नाव वगळले जाऊ नये
मतदार यादीतील त्रुटी किंवा चुकीच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार बाधित होऊ नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. खोटी माहिती, बनावट कागदपत्रे किंवा चुकीचे तपशील सादर करून फॉर्म क्रमांक ७ अंतर्गत हरकती दाखल केल्या असल्यास संबंधित अर्जांची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रांताधिकाऱ्यांकडून आश्वासन; आंदोलनाचा इशारा
यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव विनाकारण मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने तातडीने चौकशी करून पारदर्शक कार्यवाही करावी. अन्यथा भुसावळमधील नागरिकांच्या मतदानाच्या हक्कासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
‘नियम सर्वांसाठी समान आहेत. मतदारांच्या हक्कांशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,’ अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे.
