एस. एन. नांदेडकर यांच्या पुढाकारातून आंबेडकरी विचारांचा ऐतिहासिक विशेषांक!
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेषांकाचे नियोजन; कवी, लेखक, पत्रकार आणि विचारवंतांना साहित्य पाठविण्याचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने आंबेडकरी विचारांचा विशेषांक प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा विशेषांक बाबासाहेबांचे विचार, सामाजिक परिवर्तनाचा संघर्ष आणि आंबेडकरी चळवळीच्या वैचारिक-साहित्यिक वाटचालीचा महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे.
या विशेषांकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सामाजिक परिवर्तनाचा संघर्ष, संविधानिक मूल्ये, वर्तमान सामाजिक परिस्थिती, आंबेडकरी चळवळीची वाटचाल आणि साहित्यिक अभिव्यक्ती अशा विविध विषयांना स्थान दिले जाणार आहे.
अप्रकाशित साहित्य पाठविण्याचे आवाहन
या विशेषांकासाठी चळवळीतील सदस्य, कवी, लेखक, पत्रकार, विचारवंत आणि हितचिंतक यांनी आपले अप्रकाशित व दर्जेदार लेख, कविता, साहित्य तसेच वैचारिक आणि सामाजिक अनुभव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, व्यावसायिक आणि उद्योजकांनी जाहिराती देऊन या उपक्रमाला सहकार्य करावे, असेही आयोजकांनी म्हटले आहे.
प्राचार्य संघशिल भद्रे यांच्यावर संपादकीय जबाबदारी
या विशेषांकासाठी अनुभवी आणि अभ्यासू संपादकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषांकाचे संपादन प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, कवी, लेखक आणि पत्रकार संघशिल भद्रे (एस. एन. नांदेडकर सर) करीत आहेत.
हा विशेषांक केवळ एक प्रकाशन न राहता आंबेडकरी चळवळीच्या वैचारिक आणि साहित्यिक वाटचालीचा संदर्भदस्तावेज ठरावा, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांच्या विचारांना शब्दरूपी अभिवादन करण्याबरोबरच त्यांचा विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
त्यामुळे लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार आणि समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
