मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज; बहिणींना दिली प्रेमाची भेट
चोपडा/जळगाव : प्रतिनिधी
कितीही मोठे पद मिळाले, जबाबदाऱ्यांचा व्याप कितीही वाढला, तरी बहिणीच्या मायेपुढे भाऊ हा नेहमीच भाऊ असतो. या अतूट नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या भाऊबीज साजरी करण्याच्या निमित्ताने आला.
आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत गुलाबराव पाटील यांनी चोपडा येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या दोन्ही बहिणींच्या घरी भेट दिली आणि त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. बहिणींच्या प्रेमाचा स्वीकार करत त्यांना भाऊबीजेची प्रेमळ भेट दिली. मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतानाही कौटुंबिक नात्यांतील जिव्हाळा जपण्याची त्यांची कृती उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरली.
रक्षाबंधनानंतर भाऊबीजेलाही जपला मायेचा धागा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तीन बहिणी असून, त्यापैकी सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर या चोपडा येथे वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनाच्या सणालाही गुलाबभाऊंनी दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली होती. आता भाऊबीजेच्या निमित्तानेही त्यांनी आवर्जून बहिणींच्या घरी भेट देत आपुलकी आणि प्रेम व्यक्त केले.
राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यापातही कौटुंबिक नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या गुलाबभाऊंच्या या भेटीमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पदापेक्षा नाती मोठी!
सार्वजनिक जीवनात हजारो कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे गुलाबभाऊ आपल्या बहिणींसाठी मात्र आजही तेच प्रेमळ आणि मायेचे भाऊ आहेत. पद, प्रतिष्ठा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन रक्ताची नाती जपण्याचा त्यांचा स्वभाव या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाला.
रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज, बहिणींच्या सुख-दुःखात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावनिक बांधिलकी या भेटीतून व्यक्त झाली. मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला ठेवून बहिणींच्या मायेचा आनंद घेणारे गुलाबभाऊ या निमित्ताने पुन्हा एकदा कुटुंबासाठीचे लाडके भाऊ ठरले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक आबा देशमुख, भैया पवार, राजाराम पाटील, अशोक पाटील, भरत देशमुख, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
