वडणे येथे वृक्षांचे नुकसान करणाऱ्यांवर ग्रामसभेचा दंडात्मक बडगा!
तीन वृक्षांच्या नुकसानीप्रकरणी मेंढपाळाला तीन हजार रुपयांचा दंड; वृक्षसंवर्धनासाठी ग्रामस्थांचा कठोर निर्णय
वडणे : प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील वडणे येथे लोकसहभागातून लावण्यात आलेल्या वृक्षांचे नुकसान करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेतली आहे. मेंढपाळांच्या कळपामुळे तीन वृक्षांचे नुकसान झाल्याप्रकरणी ग्रामसभेत संबंधित मेंढपाळाला प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाची परिसरात चर्चा होत आहे.
तीन वृक्षांचे नुकसान; ग्रामस्थांनी घेतली दखल
वडणे निसर्ग खान्देश मंच, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावात वड, पिंपळ यांसह विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण करण्याचे काम सुरू असतानाच मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी मेंढपाळांच्या कळपामुळे बापू दौलत गिरासे यांच्या शेतालगत लावलेल्या तीन वृक्षांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली.
या प्रकाराची ग्रामस्थांनी गंभीर दखल घेत त्याच दिवशी सायंकाळी श्री गणपती मंदिरात ग्रामसभा आयोजित केली. सभेत वृक्षांचे नुकसान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार नुकसान झालेल्या प्रत्येक वृक्षासाठी एक हजार रुपये याप्रमाणे संबंधित मेंढपाळाला तीन हजार रुपयांचा दंड निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती
या ग्रामसभेला माजी सरपंच भटू चुडामन ठाकरे, माजी सरपंच भटू दिवाण गिरासे, माजी उपसरपंच भाऊसाहेब किसन पाटील, भिका वसंत कासार, विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब शालिग्राम पाटील, वडणे निसर्ग खान्देश मंचचे अध्यक्ष डॉ. रविंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रा. विजय पाटील, कृषिभूषण दिलीप पाटील, निसर्गप्रेमी ओंकार राघो पाटील, पत्रकार श्रीकृष्ण सोनू पाटील, यशवंत दौलत पाटील, माजी मुख्याध्यापक रामदास तोताराम पाटील, बंकट तोताराम पाटील, हाटेसिंग गुलबा गिरासे, आनंदा उत्तम पाटील, महात्मा पाटील, पप्पू पाटील, खुमान भिल, प्रवीण पाटील, रघुनाथ कोळी (बामखेडकर), निसर्गप्रेमी आबासाहेब विठ्ठल राजपूत, बापू दौलत गिरासे आणि निसर्गप्रेमी नितीन अशोक सोनार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षलागवडीसोबत संरक्षणही महत्त्वाचे
लोकसहभागातून लावलेल्या वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असा संदेश वडणे ग्रामस्थांच्या या भूमिकेतून देण्यात आला आहे.
