हजारो डोळ्यांत उजेड पेरणाऱ्या सेवायज्ञातून आणखी ५०७ रुग्णांना नवदृष्टीची आशा!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून १८ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी; पाळधीतील मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
७३८ रुग्णांची तपासणी; ५०७ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र, पहिल्या टप्प्यात १०० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रवाना
पाळधी/जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) : अंधुक झालेल्या दृष्टीला पुन्हा उजेड देत गरजूंच्या आयुष्यात आशेचा नवा किरण फुलविण्याचा सेवायज्ञ जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आजवर १८ हजारांहून अधिक गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे नवदृष्टी मिळाली आहे. याच सेवाकार्याचा पुढील टप्पा म्हणून पाळधी येथे आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनातून पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ७३८ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी ५०७ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. यातील पहिल्या टप्प्यात १०० रुग्णांना आज शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. उर्वरित ४०७ रुग्णांवरही टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सेवाभावाला कृतीची जोड; १८ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून जीपीएस मित्र परिवाराने नेत्रसेवेची चळवळ उभी केली आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रोपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने सातत्याने मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून आजवर १८ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी मिळाली असून, अनेक कुटुंबांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण झाला आहे.
पाळधी येथील शिबिरात प्रतापराव पाटील यांच्या नियोजनामुळे रुग्णांची नोंदणी, तपासणी आणि शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली. ५०७ पात्र रुग्णांपैकी पहिल्या टप्प्यात १०० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले असून, उर्वरित रुग्णांवर नियोजनबद्ध पद्धतीने उपचार केले जाणार आहेत.
वैद्यकीय पथकाचे मोलाचे योगदान
शिबिराच्या यशस्वितेसाठी आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. मोहसीन सय्यद, डॉ. सुजय कोल्हापुरे, डॉ. सुदेश पाटील तसेच पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झंवर यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्यासह डॉ. राहुल चौधरी, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सुरेश पाटील, डॉ. निलोफर शेख आणि डॉ. रितुल पाटील यांनीही रुग्णांच्या तपासणीसाठी परिश्रम घेतले.
आरोग्य सहाय्यक अनिल महाजन, अतुल नन्नवरे, प्रदीप अडकमोल, आरोग्य सेविका चेतना पाटील, सर्व आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि जीपीएस मित्र परिवाराच्या सदस्यांचे शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
चौकट : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सेवाकार्याचा संकल्प
“माणसाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करण्यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही. दृष्टी मिळाल्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद हीच आमच्या सेवाकार्याची खरी कमाई आहे. आजवर १८ हजारांहून अधिक रुग्णांच्या आयुष्यात नवदृष्टीचा प्रकाश पोहोचवू शकलो, याचे समाधान आहे. गरजूंच्या डोळ्यांत आशेचा उजेड फुलविणारा हा सेवायज्ञ यापुढेही अखंड सुरू राहील.”
— गुलाबराव पाटील, पालकमंत्री
