साहित्य, गीत आणि संवेदनांचा त्रिवेणी संगम; अरविंद जगताप जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी!
प्रसिद्ध साहित्यिक, गीतकार व पटकथालेखक अरविंद जगताप यांची निवड; २८ व २९ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरात संमेलन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : आपल्या लेखणीतून सामान्य माणसाच्या भावविश्वाला शब्दरूप देणारे, सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण करणारे आणि साहित्य, चित्रपट व गीतलेखन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे प्रसिद्ध साहित्यिक, गीतकार व पटकथालेखक अरविंद जगताप यांची जिल्हा मराठी साहित्य संमेलन–२०२६ च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्यप्रेमी आणि रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
साहित्यलेखनातून सामान्य माणसाच्या जगण्याला शब्दरूप
अरविंद जगताप हे मराठी साहित्यविश्वातील संवेदनशील आणि लोकप्रिय लेखक म्हणून परिचित आहेत. ‘पत्रास कारण की’, ‘सेल्फी’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी मानवी नातेसंबंध, सामाजिक प्रश्न आणि सामान्य माणसाच्या जगण्यातील वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ‘आप्पांचे पत्र’ हा त्यांचा लेख शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. त्यांच्या लेखनातील साधेपणा, संवेदनशीलता आणि सामाजिक आशय वाचकांच्या मनाला भिडतो.
साहित्यिक लेखनासोबतच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, पटकथा आणि संवादलेखन केले आहे. ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ यांसारख्या आशयपूर्ण गीतातून त्यांच्या सामाजिक जाणिवांचे दर्शन घडते. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातील त्यांच्या भावस्पर्शी पत्रलेखनानेही रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
साहित्य संमेलन २८ व २९ नोव्हेंबरला
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठवाडा महसूल प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर येथे हे संमेलन पार पडणार आहे.
अरविंद जगताप यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा साहित्यधारा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांनी केली. शब्दांतून समाजाचे वास्तव मांडणारे, लेखणीतून माणुसकीचा जागर करणारे आणि साहित्याला सामाजिक संवेदनांची जोड देणारे जगताप यांच्या अध्यक्षीय निवडीमुळे संमेलनाला साहित्यिक उंची आणि वैचारिक दिशा मिळेल, अशी अपेक्षा साहित्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
