पारोळ्यात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात; आमदार अमोल पाटील मिरवणुकीत सहभागी
आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे भव्य जयंती उत्सव; जल, जंगल, जमीन आणि आदिवासी अस्मितेच्या लढ्याला अभिवादन
पारोळा (प्रतिनिधी – संदीप पाटील) :
जल, जंगल, जमीन आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे महान क्रांतिकारक आणि आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पारोळा येथे भव्य जयंती उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ, पारोळा यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
भव्य मिरवणुकीत आमदार अमोल पाटील यांचा सहभाग
पारोळा शहरातील मोठे श्रीराम मंदिर चौकातून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. आमदार अमोल पाटील यांनी मिरवणुकीत सहभागी होत आदिवासी समाजबांधवांच्या उत्साहात आणि आनंदात सहभाग नोंदवला. समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पारंपरिक उत्साह आणि मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक सत्तेविरुद्ध लढा देत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि जल, जंगल व जमिनीच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे क्रांतिकारी विचार, संघर्षमय जीवन आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याचा त्यांनी दिलेला संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंदआबा शिरोळे, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, माजी उपनगराध्यक्ष दीपकदादा अनुष्ठान, नगरसेवक राजूभाऊ कासार, प्रमोदशेठ कासार, विवेकदादा पाटील, माजी नगरसेवक प्रकाश भोई, नगरसेवक नजीरखान बेलदार, भूषण टिपरे, सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोई, युवासेना शहरप्रमुख मोहित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक, आदिवासी ठाकूर समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.