आदिवासी विकासाच्या योजनांना गती; लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर!
यावल येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा उत्साहात समारोप; जिल्ह्यात ८१ विशेष शिबिरांचे आयोजन, हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
यावल | प्रतिनिधी
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चा समारोप एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे उत्साहात झाला. आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील आदिवासी गावे आणि पाड्यांवर ८१ विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक अस्मिता जपण्यासोबतच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश होता. विविध विभागांच्या समन्वयातून योजनांचा लाभ, शासकीय सेवा आणि जनजागृती उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
पाणी, वीज आणि महिला आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य
आदिवासीबहुल भागातील मूलभूत सुविधांवर भाष्य करताना आमदार अमोल जावळे यांनी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी पालकमंत्र्यांकडून १२.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या दुर्गम पाड्यांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्याचे काम प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यावल येथे दोन कोटी रुपये खर्चून ‘बहिणाई मॉल’ उभारण्यात येत आहे. या मॉलमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, हस्तकला, वनोपज आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबत शिलाई मशीन आणि आधुनिक स्वयंपाकघराची सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुष्मान भारत कार्डचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना
लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमित मिळण्यासाठी लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक संलग्न असल्याची खात्री करावी, असे आवाहन आमदार जावळे यांनी केले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पुढील दीड ते दोन महिन्यांत शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांना कार्ड उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गावोगावी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळत असल्याने प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
बचत गट, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना लाभांचे वितरण
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ९२ महिला बचत गटांना विविध लाभांचे वितरण करण्यात आले. चार लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, तर १६ आदिवासी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यासोबत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ, पात्र नागरिकांना वनपट्टे आणि रेशन कार्डांचे वितरण करण्यात आले.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या १६ शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. आदिवासी पारंपरिक वैद्य तसेच वारली चित्रकलेच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना देणाऱ्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
आरोग्य तपासणी, रक्तदान आणि जनजागृतीचा उपक्रम
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३४ जणांनी रक्तदान केले, तर ४० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
याशिवाय आधार नोंदणी, कृषीविषयक मार्गदर्शन, पारंपरिक उपचार पद्धतींची माहिती, पेसा कायद्याबाबत जनजागृती आणि व्यसनमुक्तीविषयक पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विविध शासकीय योजनांची माहिती, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि आवश्यक सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने या शिबिरांचा नागरिकांना उपयोग झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले. समारोपप्रसंगी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
