आईच्या संस्कारांना यशाची झळाळी; खुशी मुणोतच्या दुहेरी यशाचा गौरव!
सीए आणि सीएस या दोन्ही प्रतिष्ठित पदव्या संपादन करणाऱ्या खुशीसह आई विना मुणोत यांचा लीनेस क्लबतर्फे सन्मान; ‘मासे बेटी सवाई’ अभियानांतर्गत प्रेरणादायी उपक्रम
जळगाव : मुलांच्या यशामागे आईचे निःशब्द कष्ट, त्याग, जिद्द आणि संस्कार यांचा मोठा वाटा असतो. आईने दिलेल्या संस्कारांच्या बळावर मुलगी जेव्हा यशाचे शिखर गाठते, तेव्हा तिचे यश संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरते. याच भावनेचा प्रत्यय खुशी मुणोत हिने मिळविलेल्या दुहेरी यशातून आला. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि कंपनी सेक्रेटरी (सीएस) या दोन्ही प्रतिष्ठित व्यावसायिक पात्रता संपादन करणाऱ्या खुशी मुणोत आणि तिच्या आई विना मुणोत यांचा लीनेस क्लब जळगावतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
लीनेस क्लब जळगावच्या वतीने दर महिन्याला राबविण्यात येणाऱ्या ‘मासे बेटी सवाई’ या अभियानाच्या उपक्रमांतर्गत हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. खुशीने मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर दोन प्रतिष्ठित व्यावसायिक पात्रता संपादन करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीत आई विना मुणोत यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ मोलाचे ठरले.
मुलीच्या शैक्षणिक प्रवासात आईने दिलेला आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि संस्कार यांचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यामुळे क्लबतर्फे केवळ खुशीचाच नव्हे, तर तिच्या यशामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आईचाही गौरव करण्यात आला. यावेळी क्लबच्या अध्यक्ष रेखा वर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा सत्कार केवळ एका गुणवंत मुलीच्या यशाचा गौरव नसून तिच्या यशासाठी आयुष्यभर कष्ट घेणाऱ्या आणि विश्वासाने तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आईच्या त्यागाचा, कष्टांचा आणि संस्कारांचा सन्मान आहे.
क्लबच्या माजी प्रांताध्यक्ष लताताई बनवट यांच्या हस्ते खुशी मुणोत आणि विना मुणोत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्लबच्या माजी अध्यक्ष रेश्मा बेहराणी, चंद्रकला सुराणा, सुनीता बरडिया, सरोज बाफना, विजया बाफना, ललिता श्रीमाळ, कोषाध्यक्ष ज्योती कोटेचा, कल्पना काबरा, माया दोशी, उज्ज्वला मुथा यांच्यासह क्लबच्या अनेक सन्माननीय सदस्य उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी नीला चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. खुशीच्या कर्तृत्वाला आईच्या संस्कारांची मिळालेली जोड आणि या मायलेकींचा झालेला गौरव उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांच्या यशामागील मातृशक्तीचा सन्मान करणारा ‘मासे बेटी सवाई’ उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला.
