महसूलचा दणका! पाच डंपरधारकांनी भरला दंड; उर्वरित तीन थकबाकीदारांवर कारवाईची टांगती तलवार
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी आठ डंपर जप्त; पाच जणांकडून दंड वसूल, उर्वरितांवर कायदेशीर कारवाईचे संकेत
भडगाव (प्रतिनिधी – गणेश रावळ) : अवैध गौण खनिज वाहतूक आणि थकीत दंड वसुलीप्रकरणी भडगाव महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईला यश आले आहे. प्रशासनाने जप्त केलेल्या आठ डंपरपैकी पाच डंपरधारकांनी दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा केली आहे. मात्र, अद्याप तीन डंपरधारकांकडून दंडाची रक्कम वसूल झालेली नसल्याने त्यांच्यावरील पुढील कारवाईकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पाचोरा-भडगाव उपविभागीय अधिकारी आणि भडगाव तहसील प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतुकीप्रकरणी आठ डंपर ताब्यात घेतले होते. या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८ (७) व (८) तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दंड वसुलीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
महसूल प्रशासनाने दंड वसुलीसाठी कारवाईचा तगादा लावल्यानंतर पाच डंपरधारकांनी दंडाची रक्कम भरली. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा परिणाम दिसून आला आहे.
उर्वरित तीन डंपरधारकांवर पुढील कारवाईचे संकेत
पाच डंपरधारकांनी दंड भरला असला, तरी उर्वरित तीन धारकांकडून अद्याप रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या थकबाकीदारांवर महसूल प्रशासन कोणती कठोर पावले उचलणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
थकीत दंडाच्या वसुलीसाठी संबंधितांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, वाहनांचा लिलाव तसेच आरटीओकडून वाहनांना ब्लॅकलिस्ट करण्यासारख्या संभाव्य कारवाईची चर्चा सुरू आहे. मात्र, या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून अधिकृत निर्णय किंवा आदेश झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे दंड थकविणाऱ्या वाहनधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. उर्वरित तीन डंपरधारक दंड भरून प्रकरण मिटवतात की त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
