वादग्रस्त अश्लील पोस्टचा धक्का; महापौर मयादेवी परदेशी यांचे टोकाचे पाऊल, रुग्णालयात उपचार सुरू
सोशल मीडियावरील बदनामीकारक पोस्टमुळे मानसिक धक्का; विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
धुळे : सोशल मीडियावर महापौर मयादेवी परदेशी यांच्याविषयी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संजय शर्मा यांनी कथित अश्लील पोस्ट केल्याच्या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. या पोस्टमुळे मानसिक धक्का बसलेल्या महापौर मयादेवी परदेशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने धुळ्यातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे धुळ्यात राजकीय वातावरण तापले असून, संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महापौरांचे पती महादेव परदेशी यांनी संजय शर्मा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संजय शर्मा आणि आमदार समर्थक यांच्यात कट्टलखाण तसेच अवैध धंदे बंद करण्याच्या मुद्द्यावरून पोस्ट वॉर सुरू होते. या वादाला अधिक तीव्रता येत असतानाच महापौरांविषयी कथित अश्लील पोस्ट प्रसारित झाल्याने वातावरण चिघळले.
या पोस्टनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि संजय शर्मा यांच्या घरासह दुकानांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी संजय शर्मा यांना अटक केली. न्यायालयात हजर करण्यासाठी आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारातही भाजप समर्थकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, संजय शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज धुळ्यात विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महापौरांविषयीच्या कथित अश्लील पोस्ट, त्यातून निर्माण झालेला मानसिक तणाव, आत्महत्येचा प्रयत्न, तोडफोड, अटक आणि त्यानंतरचे राजकीय आंदोलन या घटनांमुळे धुळ्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.
