संविधान दिन साजरा करायचा की संविधान जगवायचं? – एक चिंतन
उत्सव, भाषणे आणि दिखावा पुरेसे नाहीत; संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रत्यक्ष जगण्यात उतरवण्याची गरज – सुरेश जगताप
मुंबई : प्रशांत ढोणे
भारतीय संविधान लागू होऊन ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भाषणे होतील, संविधानाच्या प्रती वाटल्या जातील, हार-तुरे चढवले जातील आणि संविधानाच्या गौरवाचे गोडवे गायले जातील. मात्र, या उत्सवाच्या गदारोळात एक कटू प्रश्न आपण सोयीस्करपणे विसरतो—संविधान दिन साजरा करणाऱ्यांपैकी किती जण खरोखर संविधानाचे पालन करतात? किती जण त्यातील मूल्ये आपल्या आचरणात आणतात आणि किती जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संविधानाची पायमल्ली करतात? हा प्रश्न केवळ चिंतनाचा नाही, तर सामाजिक संशोधनाचाही विषय आहे.
आजचे दुर्दैव असे की, संविधानाचे पालन न करता संविधानविरोधी कृती करायच्या आणि दुसरीकडे संविधान दिन साजरा करण्याचा देखावा करायचा. दिवसा संविधानाच्या मूल्यांची शपथ घ्यायची आणि रात्री त्याच मूल्यांना हरताळ फासणारे काम करायचे, हा दुटप्पीपणा काही ठिकाणी दिसून येतो. संविधानाचा जयघोष करणाऱ्या ओठांवर समतेची भाषा असते; मात्र प्रत्यक्ष व्यवहारात जातीय भेदभाव, धार्मिक द्वेष, आर्थिक विषमता आणि सत्तेचा अहंकार दिसत असेल, तर संविधान दिन साजरा करण्याचा अर्थ काय उरतो?
संविधानाने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही चार मूलभूत मूल्ये दिली आहेत. परंतु आज ही मूल्ये अनेकदा केवळ भाषणांच्या व्यासपीठावरच दिसतात. प्रत्यक्ष समाजजीवनात जात, धर्म, पैसा आणि सत्ता यांच्या आधारे माणसामाणसांत भिंती उभ्या केल्या जात आहेत. दुर्बल घटकांचे हक्क डावलले जात असतील, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना दाबले जात असेल आणि कायद्यापुढील समानतेचा सिद्धांत व्यवहारात कमकुवत होत असेल, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
संविधानाप्रती अनास्था ही केवळ निष्काळजीपणाची बाब नाही; तर संविधानातील मूलभूत तत्त्वांपासून समाजाला दूर नेणाऱ्या प्रवृत्तींचेही प्रतिबिंब आहे. लोकांना संविधानाच्या उत्सवात गुंतवून ठेवायचे, पण त्यांना संविधानाचे खरे स्वरूप, अधिकार आणि कर्तव्ये समजण्यापासून दूर ठेवायचे, अशी प्रवृत्ती वाढत असल्याची टीका समाजातील अनेक स्तरांतून होत आहे. नागरिकांना त्यांचे हक्क कळले, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही संस्थांना प्रश्न विचारले, तरच संविधान खऱ्या अर्थाने जिवंत राहू शकते.
म्हणून आता जागे होण्याची वेळ आली आहे. संविधान वाचवायचे असेल, तर केवळ संविधान दिन साजरा करून चालणार नाही. संविधान समजून घ्यावे लागेल, त्यातील तरतुदींचा अभ्यास करावा लागेल आणि आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी लागेल. संविधानाच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल. जनजागृतीचा असा वणवा पेटला पाहिजे, की अन्याय, विषमता आणि भेदभावाच्या प्रवृत्तींना त्यापुढे टिकता येणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला केवळ कायद्याचे पुस्तक दिले नाही, तर स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, विचारस्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि समान संधींची दिशा दिली. आपला हक्क कोणता, अधिकार काय, कर्तव्य काय आणि अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने कसे उभे राहायचे, हे प्रत्येक भारतीयाला समजले पाहिजे. संविधानाचे ज्ञान हे केवळ अभ्यासकांपुरते किंवा राजकीय नेत्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे.
संविधान म्हणजे फक्त कायद्याचे पुस्तक नाही; ते देशातील प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचा, स्वातंत्र्याचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. संविधानातील मूल्ये कमकुवत झाली, तर लोकशाहीचा पाया डळमळीत होईल. नागरिकांचा आवाज दाबला गेला, न्याय मिळण्याची प्रक्रिया दुर्बल झाली आणि समानतेचा अधिकार केवळ कागदावर उरला, तर देशाच्या लोकशाही आत्म्यालाच धोका निर्माण होईल.
आज आपण एक संकल्प करूया—फक्त संविधान दिन साजरा करायचा नाही, तर संविधान जगवायचे आहे. अन्याय दिसेल तिथे आवाज उठवायचा, भेदभावाविरुद्ध उभे राहायचे, प्रत्येकाच्या हक्कांचा आदर करायचा, लोकशाही संस्थांचे महत्त्व जपायचे आणि संविधानविरोधी प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर द्यायचे. संविधानाचा सन्मान हा एका दिवसापुरता मर्यादित नसावा; तो आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे.
संविधान दिनाच्या निमित्ताने समाजाच्या सर्व स्तरांत संविधानाचे महत्त्व, त्याचे संरक्षण आणि त्यातील मूल्यांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा दिवसेंदिवस जोर धरत आहे. संविधान सन्मान दिन साजरा करायचा की संविधानाच्या मूल्यांसाठी प्रत्यक्ष उभे राहायचे, या विषयावर आयोजित सार्वजनिक चर्चा सत्रात ज्येष्ठ पत्रकार, परखड व विद्रोही विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश जगताप यांनी आपले मत व्यक्त केले.
चला, संविधान वाचवूया! समाज जागवूया! संविधान केवळ हातात नको, तर विचारात, आचरणात आणि प्रत्येक संघर्षात जिवंत ठेवूया.
