पिंपरी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राजकीय आणि विकासाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. २३) महापालिकेत आढावा बैठक घेतली. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना सूचना देतानाच यापुढे दर महिन्याला शहरात येऊन विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीत दिवंगत अजितदादांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा सत्तेपासून दूर राहावे लागले. निवडणुकीच्या तोंडावर अनेक अनुभवी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद कमी झाली. त्यानंतर अजितदादांच्या निधनामुळे पक्षासमोर नेतृत्वाचे आव्हान निर्माण झाले. आता सुनेत्रा पवार यांनी शहराच्या राजकारणात सक्रिय लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका प्रशासनाने विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष करू नये, त्यांच्या प्रलंबित कामांमध्ये अनावश्यक अडथळे आणू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याची पाहणी करण्यासह कचरा प्रक्रिया केंद्रांच्या कामकाजात सुधारणा करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार
पिंपरी-चिंचवड आणि अजितदादा पवार यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. अजितदादांना अपेक्षित असलेले आधुनिक आणि विकसित शहर घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. महापालिकेत काम करताना केवळ विरोधासाठी विरोध न करता शहराच्या विकासासाठी महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधून काम करण्याचा सल्लाही त्यांनी नगरसेवकांना दिला.
प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे आणि माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह पक्षातील काही प्रमुख नेते अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यावर स्पष्टीकरण देताना काही पदाधिकारी परदेश दौऱ्यावर, तर काही घरगुती कारणांमुळे बाहेर असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांच्या अनुपस्थितीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दर महिन्याला शहरात येऊन विकासकामांचा पाठपुरावा करण्याच्या सुनेत्रा पवार यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आता या नियमित आढाव्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्न कितपत मार्गी लागतात आणि पक्षाचे संघटन किती मजबूत होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
