शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे!
दलित साहित्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाचा गौरव; सोलापूरला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान
सोलापूर (प्रतिनिधी) : पुणे येथे जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या या निर्णयामुळे सोलापूरच्या साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी साहित्याच्या शतक महोत्सवी संमेलनाचे नेतृत्व करण्याचा बहुमान लिंबाळे यांच्या रूपाने सोलापूरला मिळाला आहे. यापूर्वी अरण्यऋषी स्वर्गीय मारुती चितमपल्ली यांना संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यामुळे सोलापूरला दुसऱ्यांदा हा बहुमान प्राप्त झाला आहे.
मराठी साहित्याला सामाजिक वास्तवाची नवी दिशा देणारे, दलित साहित्याचा आवाज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे तसेच आपल्या लेखणीतून जातीय विषमता, अन्याय आणि शोषणावर परखड भाष्य करणारे डॉ. लिंबाळे यांच्या साहित्यिक योगदानाचा हा मोठा गौरव मानला जात आहे. वंचित, उपेक्षित आणि शोषित समाजाच्या वेदना, संघर्ष आणि मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न त्यांनी आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी ठेवला. त्यामुळे त्यांची निवड ही केवळ एका ज्येष्ठ साहित्यिकाचा सन्मान नसून समतावादी साहित्य चळवळीचाही गौरव ठरली आहे.
संघर्षातून साहित्यविश्वाच्या शिखरापर्यंतचा प्रवास
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. जातीय विषमता, गरिबी, सामाजिक उपेक्षा आणि मानवी प्रतिष्ठेसाठी करावा लागलेला संघर्ष या अनुभवांनी त्यांच्या साहित्यिक जडणघडणीला दिशा दिली. त्यांच्या लेखनात या वास्तवाचे संवेदनशील, निर्भीड आणि वास्तववादी चित्रण आढळते.
‘अक्करमाशी’ने मराठी साहित्यविश्व ढवळून काढले
डॉ. लिंबाळे यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन. १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने मराठी साहित्यविश्वात मोठी चर्चा घडवून आणली. जातीय विषमता, अस्पृश्यता, सामाजिक उपेक्षा आणि माणसाच्या अस्तित्वाचा संघर्ष त्यांनी या आत्मकथनातून निर्भीडपणे मांडला. ‘अक्करमाशी’ हे केवळ आत्मकथन न राहता दलित साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दस्तऐवज ठरले. या पुस्तकाचे विविध भारतीय भाषांसह इंग्रजीतही भाषांतर झाले आहे.
दलित साहित्याला दिली वैचारिक दिशा
डॉ. लिंबाळे यांनी कथा, कादंबरी आणि आत्मकथन लेखनाबरोबरच दलित साहित्याच्या वैचारिक आणि समीक्षात्मक मांडणीतही महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तक विशेष महत्त्वाचे मानले जाते. साहित्याचे मूल्यमापन करताना दलित समाजाचे अनुभव, वास्तव, वेदना आणि सामाजिक संघर्ष यांचाही विचार झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या लेखनामुळे दलित साहित्याच्या समीक्षा आणि सौंदर्यविचारांना नवी दिशा मिळाली.
कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नावावर चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘अक्करमाशी’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’, ‘दलित साहित्य आणि सौंदर्य’, ‘शतकातील दलित विचार’, ‘सनातन’ आणि ‘झुंड’ या त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती आहेत.
‘सरस्वती सन्मान’ने राष्ट्रीय स्तरावर गौरव
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या साहित्यिक योगदानाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीसाठी २०२० चा प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान त्यांना जाहीर झाला. या सन्मानामुळे त्यांच्या साहित्यिक कार्याला राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्या लेखनातून भारतीय समाजव्यवस्थेतील जात, धर्म, विषमता, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्ये यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा घडून आली आहे. त्यांच्या साहित्याचा विद्यापीठीय स्तरावरही अभ्यास केला जातो.
प्राध्यापक ते ज्येष्ठ साहित्यिक
डॉ. लिंबाळे यांनी मराठी विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन निग्रो साहित्य : तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागातील टेलिफोन ऑपरेटर पदापासून झाली. पुढे त्यांनी आकाशवाणीमध्ये उद्घोषक म्हणूनही काम केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. शैक्षणिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले.
शंभरावे साहित्य संमेलन ऐतिहासिक पर्व
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या शतक महोत्सवी वर्षात अध्यक्षपदाचा बहुमान मिळणे ही विशेष महत्त्वाची घटना आहे. डॉ. लिंबाळे यांच्या निवडीमुळे या संमेलनाला सामाजिक समतेचा, परिवर्तनवादी विचारांचा आणि साहित्यिक संघर्षाचा व्यापक संदर्भ लाभणार आहे.
सोलापूरच्या साहित्यिक परंपरेचा राष्ट्रीय गौरव
सोलापूर जिल्ह्याच्या मातीत जन्मलेल्या एका साहित्यिकाने आपल्या लेखणीच्या बळावर राष्ट्रीय साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली, ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. संघर्षमय जीवनातून मिळालेले अनुभव त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडले. त्यांच्या साहित्याने उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना बळ दिले. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासाचा महत्त्वपूर्ण गौरव आहे.
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे साहित्यिक योगदान आगामी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
पद्माकर कुलकर्णी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
सोलापूर जिल्हाध्यक्ष
