जळगाव परिमंडलातील ४ लाख ४९ हजार ग्राहकांना १० कोटींचा लाभ
जळगाव । वाढत्या वीजबिलामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना महावितरणच्या टाइम ऑफ डे (टीओडी) मीटरमुळे आर्थिक दिलासा मिळत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ८५ पैशांची सवलत दिली जात असून, जळगाव परिमंडलातील आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ७०७ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून ग्राहकांची एकूण १० कोटी ३ लाख रुपयांची बचत झाली आहे.
राज्यात सौरऊर्जेची उपलब्धता वाढल्याने दिवसा निर्माण होणारी वीज तुलनेने स्वस्त उपलब्ध होत आहे. त्याचा लाभ ग्राहकांनाही मिळावा, यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार जुलै २०२५ पासून टीओडी प्रणालीअंतर्गत सवलत लागू करण्यात आली. सुरुवातीला मार्च २०२६ पर्यंत प्रतियुनिट ८० पैसे सवलत होती. चालू आर्थिक वर्षात ती वाढवून ८५ पैसे करण्यात आली आहे.
जळगाव मंडलातील २ लाख ८९ हजार १५५ ग्राहकांना ६ कोटी ८ लाख रुपये, धुळे मंडलातील १ लाख १ हजार ३९३ ग्राहकांना २ कोटी २८ लाख रुपये, तर नंदुरबार मंडलातील ५९ हजार १५९ ग्राहकांना १ कोटी ६७ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.टीओडी मीटरद्वारे दिवसातील वेगवेगळ्या वेळांनुसार वीजवापराची नोंद होते. त्यामुळे ग्राहकांना तासागणिक वीजवापर मोबाईलवर पाहता येतो. स्वयंचलित रीडिंगमुळे अचूक बिल तयार होण्यासही मदत होते. विशेष म्हणजे, हे मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड आहेत. महावितरणकडून ते विनामूल्य बसविण्यात येत आहेत.
