राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत पुणे विभागाची दुहेरी बाजी!
१९ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांना प्रथम क्रमांक; धुळ्यात तीन दिवस रंगली चुरशीची स्पर्धा
धुळे (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही गटांत पुणे विभागाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. २३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान धुळे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या संघांना प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पदके देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धुळे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या सहकार्याने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यातील विविध विभागांमधून २७२ खेळाडू, ३२ क्रीडा मार्गदर्शक आणि पंच सहभागी झाले होते.
मुला-मुलींच्या दोन्ही गटांत पुणे विभाग अव्वल
अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या सामन्यांमध्ये पुणे विभागाच्या मुलांच्या व मुलींच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटातील निकाल :
-
प्रथम क्रमांक – पुणे विभाग
-
द्वितीय क्रमांक – नाशिक विभाग
-
तृतीय क्रमांक – नागपूर विभाग
-
चौथा क्रमांक – अमरावती विभाग
मुलींच्या गटातील निकाल :
-
प्रथम क्रमांक – पुणे विभाग
-
द्वितीय क्रमांक – मुंबई विभाग
-
तृतीय क्रमांक – कोल्हापूर विभाग
-
चौथा क्रमांक – नाशिक विभाग
सुवर्णपदक विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेची संधी
या स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्त खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राज्यस्तरीय विजयानंतर आता खेळाडूंचे लक्ष राष्ट्रीय स्पर्धेकडे लागले आहे.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा माजी आमदार शरद पाटील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पराग अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, वसीम शेख, किरण परदेशी, आकाश टक्के, राहुल ढोणे, रोहित घेवारी, सचिन इटकर, जावेद शेख, अभिजित भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धा चुरशीच्या लढती आणि खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडल्या. पुणे विभागाने दोन्ही गटांत मिळविलेल्या यशामुळे खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
