पोक्सोच्या गुन्ह्यात तिघांची निर्दोष मुक्तता; धुळे विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!
सामाईक भिंतीच्या वादातून दाखल झाला होता गुन्हा; पुराव्यांतील विसंगती अधोरेखित करत न्यायालयाचा निर्णय, अॅड. अमित दुसाणे यांचा प्रभावी युक्तिवाद
धुळे (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यात सामाईक भिंतीच्या बांधकामावरून झालेल्या वादातून मारहाण, विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत २०२१ मध्ये दाखल झालेल्या खटल्यात धुळे येथील विशेष पोक्सो न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने अॅड. अमित दुसाणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
शिंदखेडा तालुक्यात २०२१ मध्ये सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता. या घटनेनंतर दोंडाईचा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विनयभंग आणि अन्य कलमांन्वये एका अल्पवयीनासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला विशेष न्यायाधीश (पोक्सो) ए. एस. भागवत यांच्या न्यायालयात चालला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या आरोपांसंदर्भातील फिर्याद, जबाब तसेच साक्षीदारांच्या साक्षींमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपींच्या कृतीमागे लैंगिक हेतू असल्याचे अभियोजन पक्षाला पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता आले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मारहाणीच्या आरोपांबाबतही साक्षीदारांच्या जबाबांत तफावत आढळून आली. पंच साक्षीदाराने फिर्यादीच्या बाजूने साक्ष न दिल्याने घटनास्थळ आणि शस्त्र जप्तीच्या प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली. तसेच, वैद्यकीय पुराव्यांशीही साक्षीतील बाबी विसंगत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
दोन्ही कुटुंबांमध्ये सामाईक भिंतीच्या बांधकामावरून पूर्वीपासून वाद असल्याने आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकवले असण्याची शक्यताही न्यायालयाने विचारात घेतली. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने संजय भाईदास पाटील, सागर संजय पाटील आणि सुनीता संजय पाटील या तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. अमित दुसाणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना अॅड. प्रियंका विभाडीक यांनी सहकार्य केले.
