सार्वजनिक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांची संविधानावर मनोगते; ‘संविधान : आपला अभिमान, आपला श्वास’ या विषयावर पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण
(प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी मनोगते व्यक्त केली, तर ‘संविधान : आपला अभिमान, आपला श्वास’ या विषयावरील पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव विलास चौधरी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आठवीची विद्यार्थिनी सुहानी बिऱ्हाडे हिच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली.
जान्हवी सोनार, सिद्धार्थ कापडणे, हर्षा पाटील, रिंकल मोमने, देवयानी कोळी, नरेश कुंभार, परम चिरमाडे, यश नाथ, सौम्या पाटील, तन्मय झुरकाळे आणि कुणाल वाणी या विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी आपले विचार मांडले. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेतील त्याचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
वैष्णवी पाटील, सृष्टी डोळसे, धनश्री वाणी, रवींद्र कापडणे, भावेश पाटील, छायेंद्र पाटील आणि रुद्र शिंपी या विद्यार्थ्यांनी ‘संविधान : आपला अभिमान, आपला श्वास’ हे पथनाट्य सादर केले. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये या विषयांवर आधारित या नाटिकेचे शुभांगिनी महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून प्रभावी सादरीकरण करून घेतले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्रमुख अतिथी प्रशांत कोल्हे सर यांनी उद्देशिकेचे महत्त्व विशद केले. शुभांगिनी महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला मंगला नारखेडे आणि मिनाक्षी ढाके उपस्थित होत्या. सूत्रसंचालन स्नेहा खोडपे हिने केले, तर हेतल कोल्हे हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
