वडजाई रोड परिसरात वीज उपकेंद्रासाठी जागा द्या; काँग्रेसचा मनपा प्रशासनाला इशारा!
३३/११ केव्ही उपकेंद्र उभारण्याची मागणी; वाढत्या लोकसंख्येमुळे वीज रोहित्रांवर अतिरिक्त भार, नागरिकांना वारंवार वीज समस्यांचा फटका
धुळे (प्रतिनिधी) :
धुळे शहरातील वडजाई रोड आणि शंभर फुटी रस्त्याच्या परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वस्तीमुळे वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विद्यमान विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वडजाई रोड परिसरात ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्याकरिता महापालिकेने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीन पटेल यांनी केली आहे.
यासंदर्भात पटेल यांनी महापालिका आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांना निवेदन दिले आहे. महापालिका प्रशासनाने उपकेंद्रासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अनेक नागरी वस्त्यांना वीज समस्यांचा फटका
वडजाई रोड, शंभर फुटी रस्ता, महावीर नगर, ५० खोली परिसर, विठ्ठल नगर, कबीरगंज, मिल्लत नगर, गरीब नवाज नगर, माणिक नगर, तिरंगा चौक, आझाद नगर, जामचा मळा, बोरसे नगर आणि अरिहंत कॉलनी यांसह परिसरातील अनेक भागांचा वेगाने विस्तार होत आहे. वाढत्या वीजवापरामुळे विद्यमान विद्युत डीपी आणि रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांना वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन जीवनासह व्यावसायिक कामकाजावरही या समस्यांचा परिणाम होत असल्याचे पटेल यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी उपकेंद्राची गरज
वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत वीज वितरण यंत्रणेची क्षमता वाढविणे अत्यावश्यक आहे. वडजाई रोड परिसरात ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारल्यास परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली आहे.
या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
