तेहरान : मध्यपूर्वेत सहा आठवडे सुरू असलेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी जाहीर झाली असली तरी तणाव कमी झाल्याची चिन्हे दिसत नाहीत. शस्त्रसंधीनंतर अवघ्या २४ तासांत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत तेथील जहाजांना थेट धमकीचे संदेश पाठवले आहेत. “परवानगीशिवाय सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास जहाजे उडवून टाकू,” असा इशारा इराणी नौदलाने दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत इराणने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. फार्स वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इराणी नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी सर्व प्रकारची वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, या मार्गातून जाणाऱ्या अनेक व्यापारी जहाजांना आणि तेल टँकर्सना थांबावे लागले आहे.
शिपिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ परिसरात असलेल्या जहाजांना सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. “इराणच्या परवानगीशिवाय पुढे सरकू नका,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. परवानगीशिवाय पुढे गेल्यास जहाजे नष्ट केली जातील, अशी धमकीही देण्यात आली आहे.
युद्धविरामानंतरही परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, युद्धविरामानंतर केवळ दोन जहाजांनीच होर्मुझ सामुद्रधुनी पार केली आहे. सध्या शेकडो जहाजे आणि तेल टँकर्स या भागात अडकून पडली असून, त्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जगातील सुमारे २० टक्के खनिज तेलाची वाहतूक या मार्गातून होते. त्यामुळे या मार्गावरील अडथळ्याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली होती. मागील ४० दिवसांत ही कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केले; मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारला, तरीही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.
दरम्यान, या घडामोडींमुळे आखाती देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक पातळीवर व्यापार, तेलपुरवठा आणि सुरक्षा यावर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
