महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत उद्योजकतेत समावेशकतेचा संदेश
मुंबई : बहुजन, ग्रामीण आणि वंचित समाजातील उद्योजकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ‘नेक्स्ट जनरेशन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (NCCI) या नव्या व्यासपीठाचा मुंबईत भव्य शुभारंभ करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत वांद्रे-कुर्ला संकुलातील वॉकहार्ट टॉवर्स येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. उद्योग, बँकिंग, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी मोठी उपस्थिती होती.
संस्थापक प्रवीण मोरे आणि सहसंस्थापिका शितल बोराडे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या चेंबरने सुरुवातीलाच स्पष्ट संदेश दिला—आर्थिक संधी केवळ काही मोजक्या लोकांपुरत्या मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना मोरे यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना भांडवल, बाजारपेठ आणि संस्थात्मक पाठबळापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही दरी मिटविणे हेच NCCI चे मुख्य ध्येय आहे.
कार्यक्रमात उद्योग आणि बँकिंग क्षेत्राकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. वॉकहार्ट ग्रुपचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हुझैफा खोराकीवाला यांनी संस्थेला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. निवृत्त सनदी अधिकारी डॉ. संजय चहांदे यांनी उद्योजकतेसाठी ज्ञान, कौशल्य आणि भांडवल यांची सांगड आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. पात्र उद्योजकांना व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
मंत्रालयातील अवर सचिव विशाखा आढाव यांनी शासनस्तरावरून आवश्यक सहकार्याची हमी देत, महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांना पुढे नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या प्रतिनिधींनी कर्जप्रक्रिया व विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. महिला उद्योजकतेलाही या उपक्रमात विशेष स्थान देण्यात आले. उद्योजिका स्नेहा भालेराव यांनी चेंबर पारदर्शक व सर्वसमावेशक असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी शितल बोराडे यांनी आभार प्रदर्शन करत राज्यभरातील उद्योजक, स्टार्टअप्स आणि बचत गटांनी NCCI चे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. उद्योग, समता आणि सक्षमीकरण यांचा संगम साधणारे हे व्यासपीठ भविष्यात वंचित उद्योजकांसाठी नवी दिशा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
