जीपीएस मित्रपरिवाराचा धडाकेबाज उपक्रम; २,५०० नागरिकांची नोंदणी, गावात जनजागृतीची लाट
पाळधी : मतदार हक्काबाबत जागरूकता निर्माण करत “एकही मतदार वंचित राहू नये” हा ठाम निर्धार प्रत्यक्ष कृतीत उतरवत जीपीएस मित्रपरिवाराने राबवलेला मतदार मॅपिंग SIR कॅम्प गावात अक्षरशः लोकचळवळ ठरला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाने मतदानाबाबतची उदासीनता झटकून टाकत नागरिकांना नवसंजीवनी दिली आहे.
या कॅम्पमध्ये तब्बल २,५०० नागरिकांचे मतदार मॅपिंग पूर्ण करण्यात आले असून, ही संख्या गावाच्या इतिहासातील विक्रमी मानली जात आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे मतदान हक्कापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये एकही मतदार वंचित राहू नये, यासाठी हा कॅम्प अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, जीपीएस मित्रपरिवाराने केवळ औपचारिक कॅम्प न भरवता घराघरात जाऊन जनसंपर्क साधला. मागील काही दिवस गावभर दवंडी देत, गल्लीबोळांत फिरून नागरिकांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करत तरुणाईला या मोहिमेशी जोडण्यात आले. या मोहिमेत प्रतापराव पाटील स्वतः मैदानात उतरून नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसले, ज्यामुळे उपक्रमाला अधिक विश्वासार्हता आणि बळ मिळाले.
या संपूर्ण प्रक्रियेत बीएलओ, शिक्षक, उपशिक्षक, शासकीय कर्मचारी आणि बीएलए यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व घटकांनी एकजुटीने काम केल्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचा परिणाम केवळ मतदान प्रक्रियेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया देखील सुलभ झाली आहे. त्यामुळे गावात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“प्रत्येक मतदार सुरक्षित – प्रत्येक बूथ मजबूत” हा संदेश आता प्रत्यक्षात उतरवण्यात जीपीएस मित्रपरिवार यशस्वी ठरला आहे. भविष्यातही असेच लोकाभिमुख, परिणामकारक आणि जनजागृती करणारे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त होत असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून जोरदार कौतुक होत आहे.
