प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ यांच्या लेखणीतून संविधान ते वर्तमान राजकारणाचा वस्तुनिष्ठ आढावा; अभ्यासकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : भारतीय लोकशाहीच्या अमृतमहोत्सवी प्रवासाचे सखोल आणि तटस्थ विश्लेषण मांडणारे ‘भारतीय संविधान आणि लोकशाही अमृत महोत्सवी वाटचाल, एक दृष्टीक्षेप’ हे प्रा. डॉ. जयसिंह सुनीता सुभाष ओहोळ लिखित पुस्तक सध्या अभ्यासक, विद्यार्थी आणि वाचकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. “घागरीत सागर” अशी उपमा मिळवणारे हे पुस्तक लोकशाहीचे विविध पैलू अत्यंत नेमकेपणाने उलगडते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या पुस्तकात भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतच्या लोकशाही प्रवासातील महत्त्वाचे टप्पे सुसंगत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. ऐतिहासिक घटनांचा केवळ आढावा न घेता, त्यामागील सामाजिक-राजकीय संदर्भ, बदलते प्रवाह आणि त्याचे परिणाम यांचेही विश्लेषण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळापासून ते सध्याच्या राजकीय आणि न्यायिक घडामोडींपर्यंतच्या विषयांना लेखकाने निर्भीडपणे स्पर्श केला आहे. लोकशाहीसमोरील आव्हाने, संकटे आणि त्यावर उपाययोजनांची स्पष्ट मांडणी हे या पुस्तकाचे वेगळेपण ठरते.
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही हे पुस्तक समृद्ध आहे. बुद्ध, प्लेटो, ॲरिस्टॉटल, जॉन ड्यूई, अब्राहम लिंकन, जॉन स्टुअर्ट मिल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विचारवंतांच्या संकल्पनांचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांना लोकशाहीची संकल्पना अधिक सखोल आणि व्यापक पातळीवर समजण्यास मदत होते. लेखकाने कोणत्याही राजकीय विचारसरणीकडे झुकणारी भूमिका न घेता वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे” या विचाराशी प्रामाणिक राहून संपूर्ण पुस्तकाची मांडणी करण्यात आली असल्याचे वाचकांचे मत आहे.
आजच्या काळात लोकशाही मूल्यांपुढे अनेक आव्हाने उभी ठाकलेली असताना, तिचा ऐतिहासिक आणि वर्तमान प्रवास समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
