🔹 कामावर असताना प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेत असतानाच प्राणज्योत मालवली
पाळधी : पाळधी बुद्रुक येथील रहिवासी जितेंद्र उर्फ टिनू दगडू पाटील (वय ३८) यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र पाटील हे कामानिमित्त बाहेर गेले असताना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक डोकेदुखी व चक्कर येऊ लागली. वाढत्या उष्णतेमुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समजते.
⚠️ उष्णतेचा वाढता धोका
सध्या जळगाव जिल्ह्यासह परिसरात तापमानात मोठी वाढ झाली असून, उष्माघाताच्या घटना वाढत आहेत. नागरिकांनी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
📌 घटनेने हळहळ
जितेंद्र पाटील यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
