🔹 आखाजी सणानिमित्त एका दिवसात तब्बल २०० किलो पुरणपोळ्यांची विक्री; महिलांचा अभिनव उपक्रम ठरला यशस्वी
जळगाव : जळगावमध्ये पारंपरिक खापरावर भाजलेल्या पुरणपोळीची परंपरा आता नव्या रूपात बाजारपेठेत अवतरली असून, याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खान्देशातील आखाजी सण आणि खापरावरची पुरणपोळी हे अतूट नाते मानले जाते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे घराघरातून ही परंपरा लोप पावत असताना, स्थानिक महिलांनी पुढाकार घेत ती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदा जळगाव शहरातील विविध भागांत खापरावरच्या पुरणपोळीचे स्टॉल उभारण्यात आले होते. गणेश कॉलनी, बहिणाबाई उद्यान, प्रभात चौक, पिंप्राळा अशा सुमारे १० ठिकाणी सकाळपासूनच खवय्यांनी गर्दी केली. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाचे चित्र म्हणजे, अवघ्या एका दिवसात तब्बल २०० किलो तयार पुरणपोळ्यांची विक्री झाली. पारंपरिक चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खापरपोळीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली.
🔥 महागाईचा परिणाम, तरीही चवीत तडजोड नाही
गतवर्षी ७० रुपयांना मिळणारी एक खापरपोळी यंदा ८० रुपयांवर पोहोचली आहे. गॅस सिलिंडर, साखर आणि डाळींच्या वाढलेल्या किमतीमुळे दर वाढले असले तरी ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष करत चवीला प्राधान्य दिले. अनेक ग्राहक सकाळी ७ वाजल्यापासूनच स्टॉलवर पोहोचले होते.
👩🍳 महिलांचा अभिनव उपक्रम
शहरीकरणामुळे घराघरात चूल पेटवणे किंवा खापरावर पोळी बनवणे कठीण झाले आहे. ही गरज ओळखून स्थानिक कष्टकरी महिलांनी खापरपोळी विक्रीचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे त्यांना रोजगाराचे साधन मिळाले, तसेच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासही हातभार लागला आहे.
