गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा पुढाकार; विद्यार्थ्यांकडून मलेरिया प्रतिबंधाबाबत जागरूकता
जळगाव : जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने आयोजित या रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेत मलेरियाविषयी जनजागृती करण्याचा संदेश दिला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “मलेरिया टाळा, आरोग्य सांभाळा” अशा घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले. हातात चार्ट्स आणि बॅनर्स घेऊन त्यांनी मलेरियाचे कारण, लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय यांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांमध्ये रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरला.

या कार्यक्रमाचे आयोजन नाशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने करण्यात आले. प्रा. निर्भय मोहाड, प्रा. स्वाती गाडेगोणे, प्रा. दिव्याना पवार, प्रा. अश्लेषा मून, प्रा. रितेश पडघान, प्रा. सुमित भारंबे आणि प्रा. सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पाल आणि डॉ. गौरव जाधव यांची उपस्थिती लाभली. याशिवाय आशा कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये मलेरियाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, रोग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर सार्वजनिक आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
