अंतिम फेरीत मिर्रा आंद्रीयेवावर सरळ सेटमध्ये मात; कारकिर्दीतील सर्वात मोठा किताब
माद्रिद : युक्रेनची युवा टेनिसपटू मार्टा कोस्त्युक हिने शानदार कामगिरी करत माद्रीद ओपन 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अवघ्या २३व्या वर्षी तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा किताब जिंकत जागतिक टेनिस विश्वात दमदार ठसा उमटवला आहे.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कोस्त्युकने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या मीरा अॅण्ड्रीव्ह हिचा ६-३, ७-५ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कोस्त्युकने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले आणि पहिला सेट सहज जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये आंद्रीयेवाने पुनरागमनाचा प्रयत्न करत सामना चुरशीचा केला, मात्र निर्णायक क्षणी कोस्त्युकने अचूक सर्व्हिस आणि दमदार फोरहँडच्या जोरावर बाजी मारली. तिच्या संयमित आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळेच हा विजय शक्य झाला. या विजयामुळे कोस्त्युकच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले असून, आगामी ग्रँड स्लॅम स्पर्धांसाठी ती एक मजबूत दावेदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तिच्या या यशाचे टेनिस जगतातून कौतुक होत असून, युक्रेनसाठीही हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
