रायगडावर शुभारंभ, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे सांगता; १४ महिन्यांत राज्यभर जनजागृती
मुंबई : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने “कुर्मी जोडो अभियान” राबविण्याची घोषणा करण्यात आली असून, समाज एकता आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ६ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२७ या कालावधीत हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.
अभियानाचा शुभारंभ रायगड किल्ला येथे होणार असून सांगता स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ या अभियानाला प्रेरणा देण्यात आली आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश कुर्मी समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, त्यांच्यातील एकात्मतेची भावना दृढ करणे आणि समाजातील महापुरुषांचे विचार पुढे नेणे हा आहे. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या समाजघटकांमध्ये “आपण एकच आहोत” ही जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
या १४ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात समाज एकता रॅली, मेळावे, गावपातळीवरील बैठक, युवक व महिला सक्षमीकरण कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच निबंध व वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, डिजिटल माध्यमातून जनजागृती आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा यांचाही समावेश असेल.
अभियानाबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश महासचिव जयेश शेलार पाटील आणि कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील यांनी सांगितले की, “हे अभियान केवळ कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याचा, त्याची ओळख मजबूत करण्याचा आणि पुढील पिढीसाठी दिशा ठरवण्याचा व्यापक प्रयत्न आहे.” या उपक्रमामुळे राज्यभरात सामाजिक एकात्मता वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
