निकृष्ट कामावरून संताप; ऍड. पंकज गोरे यांची स्पॉट पाहणी; त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी
धुळे (सुनील निकम) : धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बालकल्याण रुग्णालयाच्या प्रवेशद्वार भिंतीला तब्बल दहा फुटांचे मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाचे उद्घाटनही अद्याप झाले नसताना भिंतीला पडलेल्या या तड्यामुळे बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना महाराष्ट्र सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत चौकशीची मागणी केली आहे.
कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह
महिला व लहान बालकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले होते. मात्र उद्घाटनापूर्वीच प्रवेशद्वाराला मोठे भगदाड पडल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे.
“जुनी भिंत मजबूत की नवीन?” – ऍड. गोरे यांचा सवाल
या घटनेवर प्रतिक्रिया देताना ऍड. पंकज गोरे यांनी प्रशासनावर उपरोधिक टीका केली. “प्रवेशद्वाराची जुनी भिंत मजबूत होती की नवीन भिंत?” असा सवाल उपस्थित करत, “अधिकाऱ्यांनी रात्री येथे बॉक्सिंग स्पर्धा घेतली होती काय?” असा टोला त्यांनी लगावला.
लोकार्पणाआधीच उघड झाला दर्जा
महिला व बाल रुग्णालयाचे तातडीने लोकार्पण करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच ऍड. गोरे यांनी केली होती. तसेच उद्घाटन लांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. प्रशासनाकडून मे महिन्यात लोकार्पणाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याआधीच भिंतीला पडलेल्या भगदाडामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
“आयसीयूही गळत होते”
गेल्या पावसाळ्यात नव्याने तयार करण्यात आलेले आयसीयू विभागही पावसात गळत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्या प्रकरणावर काय कारवाई करण्यात आली, असा सवालही ऍड. गोरे यांनी उपस्थित केला आहे.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
रुग्णालयाच्या बांधकामासह साहित्य खरेदी प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ऍड. गोरे यांनी आरोग्य आयुक्तालय, मुंबई यांच्या माध्यमातून त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दुर्घटनेचा इशारा
प्रवेशद्वाराची भिंत पावसाळ्यात कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास त्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देत ऍड. पंकज गोरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी सोनवणे यांना प्रत्यक्ष स्पॉट पंचनामा करून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख सागर साळवे, सौरभ जवराळ, ज्ञानेश्वर देवरे, विक्की गर्ग, पवन खांडरे, पवन सरग, विशाल ढेकळे आणि दर्शन खंबायत उपस्थित होते.
