रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुपालक त्रस्त; आजारी जनावरांना वेळेवर उपचार नाहीत
एरंडोल (रतन अडकमोल) : एरंडोल तालुक्यात पशुवैद्यकीय विभागातील महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आजारी जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसून पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने नियमित सुरू नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. उपलब्ध कर्मचारी अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळत असल्यामुळे ग्रामीण भागात सेवा पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी एका दवाखान्यावर तब्बल दहा ते पंधरा गावे जोडण्यात आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारीदेखील गावात फिरकत नसल्याचा आरोप पशुपालकांकडून केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा “अखेरची घटका मोजत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने जनावरांचे मृत्यू, रोगराई आणि उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे. लसीकरण मोहिमा, रोगनियंत्रण तसेच कृत्रिम रेतन सेवांवरही या परिस्थितीचा विपरीत परिणाम होत आहे.
रिंगणगाव दवाखान्यावर १५ गावांचा भार
रिंगणगाव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत तब्बल १५ गावे जोडण्यात आली आहेत. या सर्व गावांसाठी केवळ एक अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात आला आहे. मात्र संबंधित अधिकारीही नियमितपणे ग्रामीण भागात उपलब्ध राहत नसल्याने पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले असून पशुपालकांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
“माझ्या १५ शेळ्या दगावल्या”
पशुपालक शरद धनगर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “मी बँकेचे कर्ज काढून शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र शेळ्यांना आजार झाल्यानंतर मी रिंगणगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेकदा फोन केला. पण कोणीही गावात आले नाही किंवा औषध उपलब्ध करून दिले नाही. उपचाराअभावी माझ्या दहा ते पंधरा शेळ्या दगावल्या. यात माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आता बँकेचे कर्ज कसे फेडावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.”
प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि ग्रामीण भागात नियमित सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा पशुधनाचे आरोग्य गंभीर धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संदर्भात तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वारंवार फोन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
