१२ दिवसांत जिल्ह्यात दुसरा मृत्यू; रेबीजमुळे ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, मनपा प्रशासनाविरोधात संताप
जळगाव : भुसावळातील ९ वर्षीय बालकाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच जळगाव शहरातही मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने आणखी एका तरुणाचा जीव घेतला आहे. पिंप्राळा-हुडको परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेख ताहेर शेख फारुख (वय ३०, रा. पिंप्राळा-हुडको) असे मृत तरुणाचे नाव असून, गेल्या १२ दिवसांत जिल्ह्यात रेबीजमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
मृत शेख ताहेर हा हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. २५ एप्रिल रोजी घराजवळ अचानक एका मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर तसेच परिसरातील सात ते आठ जणांवर हल्ला चढवला होता. या भीषण हल्ल्यात ताहेरच्या हाताचे अक्षरशः लचके तोडण्यात आले होते. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सिरम न घेतल्याने वाढला धोका
हल्ल्यानंतर ताहेरने अँटी-रेबीज लस (ARV) घेतली होती. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची जखम अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने लसीसोबत रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (सिरम) घेणे अत्यावश्यक होते. दुर्दैवाने ते सिरम वेळेत घेण्यात आले नाही. त्यानंतर महिनाभराने २१ मे रोजी अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रेबीजची लक्षणे दिसू लागली. तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असले तरी २२ मे रोजी पहाटे १:२५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
महापालिकेविरोधात संतापाची लाट
या घटनेनंतर जळगाव शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिका प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नसबंदी मोहीम, कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नगरसेवकांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत संबंधित मनपा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन झोपेत आहे का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंप्राळा-हुडको परिसरात या घटनेनंतर पालकांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे. लहान मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवण्यासही नागरिक घाबरत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर फिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
