वडजाई रोड परिसरात खळबळ; अग्निशामक दलाच्या चार बंबांच्या मदतीने आग आटोक्यात
धुळे (सुनील निकम) : शहरातील वडजाई रोड परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडजाई रोडवरील व्हीआयपी लॉन्ससमोरील प्लास्टिकच्या गोडाऊनमधून अचानक धूर आणि आगीचे लोळ उसळू लागले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर काहींनी अग्निशामक दलाला तातडीने कळविले.
माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. चार अग्निशमन बंबांच्या सहाय्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्याचा धोका टळला आणि मोठा अनर्थ टाळण्यात यश आले.
मात्र, तोपर्यंत गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले होते. त्यामुळे गोडाऊन मालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. शॉर्टसर्किट, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांचा तपास केला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
या बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, लीडिंग फायरमन राजन महाले, अमोल सोनवणे, तसेच नरेंद्र बागुल, निलेश सोनवणे, प्रशांत मुर्तडक, धनंजय खैरनार, किरण साळवी आणि कुणाल ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
