देवपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन पिकअप वाहनांसह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त, न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंडाकृती बगीचा व प्रभात नगर परिसरातून आरोपी ताब्यात • परजिल्ह्यातील टोळीचा पर्दाफाश • इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहे का? पोलिसांचा तपास सुरू
धुळे : धुळे शहरातील मध्यरात्री जमीन खोदून केबल वायर चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीचा देवपूर पोलिसांनी पर्दाफाश करत हिंगोली व परभणी येथील सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांसह सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती जमीन खोदून भूमिगत केबल वायर चोरी करत असल्याची माहिती देवपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचत अंडाकृती बगीचा आणि प्रभात नगर परिसरात संशयित वाहनांची तपासणी केली. या कारवाईत दोन पिकअप वाहनांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये करण भादूर शिंदे (वय २६, रा. हिंगोली), अर्जुन म्हसु शिंदे (वय १९, रा. हिंगोली), सागर रमेश शिंदे (वय १८, रा. हिंगोली), कृष्णा काशिनाथ कुवर (वय ३४, रा. बुरझड, जि. धुळे), किशन देशिंग शिंदे (वय ३७, रा. हिंगोली) आणि सतीश मारुती धोतरे (वय २९, रा. परभणी) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दोन पिकअप वाहने तसेच केबल वायरसह एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या टोळीने धुळे जिल्ह्यासह इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या केबल चोरीच्या घटना घडवल्या आहेत का, याचा तपास देवपूर पोलीस करत आहेत. आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश आघाव यांच्यासह पोलीस अंमलदार मिलिंद सोनवणे, महेंद्र भदाणे, बटेन्द्र पाटील, राहुल गुंजाळ, राजेश हिरे, वसंत कोकणी, शुभम बोरसे, नितीन चव्हाण, सौरभ कुठे, शेखर देशमुख आणि प्रवीण खैरनार यांनी सहभाग घेतला. देवपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मध्यरात्री केबल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
