पहाटे पारोळा रोडवरील दुर्घटनेने खळबळ; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, चालकाविरोधात गुन्हा दाखल
धुळे (सुनील निकम) : धुळे शहरातील पारोळा रोड परिसरात शनिवारी पहाटे भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रस्ता ओलांडत असताना भरधाव लक्झरी बसच्या चाकाखाली सापडल्याने तिघांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आझादनगर पोलिसांनी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघातात वरखेडी येथील सुभाष लोटन धनगर (वय ४२), निलेश संभाजी पाटील (वय ३९) आणि सिंधुबाई शांताराम पाटील (वय ८३) यांचा जागीच मृत्यू झाला. तिघांच्याही अकाली निधनामुळे वरखेडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथून जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीकडे जाणारी लक्झरी बस (क्रमांक AR 11 B 9191) पारोळा रोड परिसरातून जात होती. त्याचवेळी वरखेडीहून धुळे बसस्थानकाच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारांनी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान भरधाव लक्झरी बसच्या चाकाखाली ते सापडल्याने भीषण अपघात झाला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त लक्झरी वाहन जप्त करून चालक अशोक पाटील (वय ३८, रा. पाचोरा) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आझादनगर पोलीस करत आहेत.
दरम्यान, पहाटेच्या शांत वातावरणात घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पारोळा रोड परिसरात वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर उभारावेत तसेच रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि पुरेशा प्रकाशव्यवस्थेसह विद्युत खांबांची उभारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचा संपूर्ण थरार कैद झाल्याचे समोर आले असून त्याच्या आधारेही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने धुळे शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
