शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती; धार्मिक वातावरणात महाआरती व प्रसाद वाटप
धुळे : शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर व जिल्हा युवासेनेच्या वतीने स्थानिक आई एकविरा माता मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून महाराष्ट्राची अखंड सेवा घडावी, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला शिवसैनिक, युवासैनिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाआरतीदरम्यान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. “जय भवानी, जय शिवाजी” तसेच “आई एकविरा माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी एकविरा मातेच्या चरणी आदित्य ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त राजकीय कार्यक्रमांपेक्षा धार्मिक आणि समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य दिल्यामुळे धुळे जिल्हा युवासेनेच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
या महाआरतीचे आयोजन शिवसेना-युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नानू भाऊ परदेशी, महानगरप्रमुख धीरज भाऊ पाटील, सागर भाऊ निकम, जयेश फुलपगारे, अविनाश जोंधळे, समर्थ मुर्तडक, गोपाल चव्हाण, चेतन शिंदे, सौरभ लहामगे, जयेश नाईक, कुंदन प्रजापत, प्रेम कानकाटे, दादू पाटील, हर्षल साळुंखे आणि संकेत मुर्तडक यांच्या हस्ते विधिवत महाआरती पार पडली. या प्रसंगी असंख्य शिवसैनिक, युवासैनिक, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा धुळेकरांसाठी विशेष आकर्षण ठरला.
