सोनोग्राफीसाठी प्रतीक्षा कमी करण्यापासून सिझेरियन व हर्निया शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध करण्याची मागणी
धुळे । सुनील निकम । जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम व सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हाव्यात, यासाठी माजी गटनेते तथा माजी नगरसेवक अमिन अ. करिम पटेल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. विशेषतः अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले एमआरआय मशीन तातडीने कार्यान्वित करण्यासह सोनोग्राफी सेवा, प्रसूती विभाग आणि शस्त्रक्रिया सुविधा बळकट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीनसाठी आवश्यक तांत्रिक कामे, स्वतंत्र कक्ष आणि विद्युत डीपीची उभारणी पूर्ण झालेली असूनही अद्याप मशीन उपलब्ध झालेले नाही. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठा आर्थिक खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन एमआरआय मशीन त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय धुळे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सोनोग्राफी तपासणीसाठी रुग्णांना तब्बल १५ ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला आहे. विशेषतः गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना याचा फटका बसत असल्याने अतिरिक्त तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून सोनोग्राफी सेवा अधिक वेगवान आणि सक्षम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
प्रसूती व शस्त्रक्रिया विभागाबाबतही अमिन पटेल यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. सध्या गुंतागुंतीच्या प्रसूती, उच्च रक्तदाबाशी संबंधित रुग्ण तसेच काही शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना हिरे मेडिकल कॉलेज किंवा इतर रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातच सिझेरियन प्रसूती आणि हर्नियासारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा रुग्णालय हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असल्याने तेथील सुविधा काळानुरूप सक्षम होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जनतेच्या आरोग्याशी संबंधित या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अमिन अ. करिम पटेल यांनी व्यक्त केली आहे. एमआरआय मशीन सुरू करणे, सोनोग्राफी सेवा वाढवणे आणि जिल्हा रुग्णालयात अधिकाधिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून यामुळे हजारो रुग्णांना थेट लाभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
