आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
एल-निनोच्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; प्रशासनाला समन्वयाने उपाययोजना राबविण्याच्या सूचना
पारोळा | (सुरेश पाटोळे) प्रतिनिधी : तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पारोळा शहरासह परिसरातील ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात निर्माण होऊ नये, यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी बोरी मध्यम प्रकल्पातून आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याच्या उपलब्धतेचा आणि त्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यंदा एल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे पावसावर परिणाम होण्याची शक्यता विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पारोळा शहरासाठी आवश्यक जलसाठा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी पारोळा शहरासोबतच बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावांच्या पाणीपुरवठ्याचाही सखोल आढावा घेण्यात आला. उपलब्ध जलसाठा, आगामी पावसाळ्यापूर्वीची परिस्थिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन तसेच आपत्कालीन नियोजन यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. नागरिकांना नियमित व अखंडित पाणीपुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश आमदार अमोलदादा पाटील यांनी दिले.
बैठकीस लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख व गटनेते अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख मनिषभाऊ पाटील, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मनोजभाऊ जगदाळे, उपगटनेते पंकजभाऊ मराठे, माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, बोरी मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता सिद्धार्थ पाटील, तामसवाडी शाखा अधिकारी प्रीतम काकडे, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता संकेत कारले यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पारोळा शहर आणि परिसरातील गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नियोजनबद्ध पद्धतीने एकत्रितपणे कार्यरत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत राबविण्यात येतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
