जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही; दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंतेत
भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे)
जून महिना संपत आला असतानाही भुसावळ तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. मान्सूनच्या आगमनाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी आधीच खते, बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून ठेवले आहे. मात्र, पावसाअभावी या साहित्याचा उपयोग करता येत नसल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहेत.
तालुक्यातील शिंदी, मोंढाळा, तळवेल, वरणगाव, फुलगाव, पिंपळगाव, वेल्हाळे, वांजोळा आदी भागांमध्ये काही शेतकऱ्यांनी अल्प उपलब्ध पाण्याच्या भरोशावर पेरणी सुरू केली आहे. तळवेल आणि परिसरात जिरायती क्षेत्रावरही मक्याची धूळपेरणी करण्यात आली आहे. मात्र, पावसाची साथ न मिळाल्यास या पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात आतापर्यंत सुमारे १ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. परंतु, लवकरच पाऊस न झाल्यास जमिनीत टाकलेले बियाणे उगवणार नाही आणि त्यासाठी झालेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच पिकांची उगवण न झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागणार असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
मान्सूनच्या आगमनात होत असलेल्या विलंबाचा फटका केवळ शेती क्षेत्रालाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही बसू लागला आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि पाणवठ्यांची पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून लवकरच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस कधी पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांसाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, वेळेत पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.