दोन दुचाकींची समोरासमोर धडक; लग्नसमारंभावरून परतणाऱ्या तरुणासह दोन मित्रांचा दुर्दैवी अंत, एक गंभीर जखमी
धरणगाव/पाळधी, दि. २३ : धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव मार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पथराड येथील रहिवासी किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८) हे आपल्या वडिलांसोबत पद्मालय येथे आयोजित लग्नसमारंभ आटोपून दुचाकीने घरी परतत होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पाळधीनजीक त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात किरण राक्षे यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या तीव्रतेमुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापतींमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, किरण राक्षे यांचे वडील बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी व मृतांना १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांना मृत घोषित केले.
मृत चेतन पाटील आणि प्रदीप निकम हे जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. ते नातेवाईकांची भेट घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या दुर्दैवी घटनेमुळे पथराड, वाडेगुडे आणि गोंदेगाव-निंभोरा परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी जळगावच्या रामानंदनगर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाळधी दूरक्षेत्र पोलीस करीत आहेत.
