धरणगावातून होणार महामार्गाची सुरुवात; समृद्धी महामार्गाशी थेट जोडणीमुळे खान्देशच्या विकासाला नवी गती
एरंडोल | प्रतिनिधी । मयूर पाटील ।
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला थेट जोडणाऱ्या प्रस्तावित जळगाव-छत्रपती संभाजीनगर सहापदरी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या उभारणीत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या महामार्गासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून अहवालही तयार करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील टाकळी परिसरातून या महामार्गाची सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लवकरच अधिसूचना जाहीर होऊन जमीन संपादन आणि निविदा प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रवेश नियंत्रित सहापदरी द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे १०५ किलोमीटर असेल. धरणगाव तालुक्यातील टाकळी गावापासून सुरू होणारा हा महामार्ग पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे खान्देश आणि मराठवाडा यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार असून औद्योगिक, कृषी आणि व्यावसायिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
प्रवासाचा वेळ निम्म्यावर
सध्या जळगावहून छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी अजिंठा घाट किंवा करड घाट मार्गाचा वापर करावा लागतो. या प्रवासासाठी साधारण दोन ते अडीच तास लागतात. मात्र, प्रस्तावित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या एका तासात पार करता येणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी झाल्याने जळगावहून मुंबई व नागपूरकडे जाणारा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. मुंबईपर्यंतचा प्रवास सुमारे चार तासांत पूर्ण करणे शक्य होईल.
अनेक गावांना मिळणार विकासाची संधी
प्रस्तावित महामार्ग धरणगाव, एरंडोल, जळगाव आणि पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमधून जाणार आहे. धरणगाव तालुक्यातील टाकळी, पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द, एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा., पिंपळकोठे प्र.चा., खेडी खुर्द, वंजरे खुर्द व वंजरे बुद्रुक या गावांचा समावेश आहे.
जळगाव तालुक्यातील लांजन, कुन्हाड, वाकडी, म्हसावद, ओर, डोमगाव आणि पाथरी या गावांनाही या महामार्गाचा लाभ मिळणार आहे. तर पाचोरा तालुक्यातील सापनेर, लालगाव, आसनखेडे खुर्द, नांद्रा, पहाण, मोहाडी, नाईकनगर, सांगवी प्र., लोहारे, साजगाव, लोहारी बुद्रुक, वरखेडी बुद्रुक, लासुरे, वाणेगाव, राजुरी बुद्रुक, वाडी, शिंदाड आणि घाहाळे या गावांमधून महामार्गाचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मिळणार भरघोस मोबदला
या महामार्गामुळे पाचोरा तालुक्यासह अनेक भागांतील शेतजमिनी संपादित होणार आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा भरघोस मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच महामार्गालगत नवीन व्यवसाय, सेवा केंद्रे आणि बाजारपेठा विकसित होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
खान्देशच्या विकासाचा नवा महामार्ग
समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी, कमी होणारा प्रवासाचा कालावधी, वाढणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी आणि कृषी उत्पादनांना मिळणारी जलद बाजारपेठ यामुळे जळगाव-छत्रपती संभाजीनगर सहापदरी महामार्ग खान्देशच्या विकासासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याची भावना नागरिक आणि व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
