मेहु–टेहू मार्गावरील भामरखेडा येथे भीषण अपघात; बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पारोळा | संदीप पाटील । प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील मेहु–टेहू मार्गावरील भामरखेडा येथील मारुती मंदिराजवळ रविवारी (५ जुलै) दुपारी सुमारे ३.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा टेम्पो (क्र. एमएच ४३ बीजी ४२६६) पारोळा येथून शिरसमणीकडे जात असताना त्याच्या पाठीमागून येणाऱ्या पारोळा–करमाड–रताळे मार्गावरील बस (क्र. एमएच १४ बीटी २०८०)ने टेम्पोला जोरदार धडक दिली.
धडकेच्या तीव्रतेमुळे टेम्पोमधील प्रवासी कमिश सीताराम पावरा (वय १३, रा. किंदी आंबा, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हा रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी तो बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक अभिमन पाटील (रा. कन्हेरे, ता. अमळनेर) यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि अन्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
