डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू निदान आणि मोफत चष्म्यांचे वितरण; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
धीरज सैतवाल जैन । नशिराबाद । विशेष प्रतिनिधी ।
नशिराबाद येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जीपीएस मित्र परिवार, गुलाबराव पाटील स्कूल मित्र परिवार, आर.आर. झुंझुनवाला हॉस्पिटल (पनवेल) आणि शिवसेना (शहर नशिराबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत शिवसेना कार्यालय, विठ्ठल मंदिरासमोर, खालची आळी, नशिराबाद येथे होणार आहे.
आयोजकांनी डोळ्यांच्या समस्या असलेल्या नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. शिबिरात नावनोंदणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.
यापूर्वी १५ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात २२८ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ४१ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले होते. त्यातील ३० रुग्णांची पनवेल येथे यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच, ज्या ६८ नागरिकांना चष्म्याचा नंबर लागला होता, त्यांना ७ जुलैच्या शिबिरात मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येणार आहे. गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहर शाखा आणि आयोजकांनी केले आहे.
