मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यावर भर
जळगाव | प्रतिनिधी
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर (भा.प्र.से.) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी ७.०० ते दुपारी १२.३५ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या २७ जून २०२६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. २९ जूनपासून बहुतांश शिक्षकांवर BLO म्हणून मतदार यादी पुनर्निरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज आणि विद्यार्थ्यांचे अध्यापन या दोन्ही गोष्टी सुरळीत पार पडाव्यात, या उद्देशाने शालेय वेळेत बदल करण्यात आला आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी ७.०० ते दुपारी १२.३५ या वेळेत चालतील. शनिवारी मात्र शाळा नियमित वेळेतच भरतील. तसेच अखेरच्या कला, क्रीडा आणि कार्यानुभवाच्या तासिकांऐवजी नियमित अध्यापन तासिका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, जिल्हास्तरीय नियोजनानुसार ‘निपुण’ तासिका सकाळी ११.०० ते १२.०० या नियमित वेळेतच घेण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे शिक्षकांना BLO म्हणून मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम प्रभावीपणे करता येणार असून, विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणातही अडथळा येणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व शाळांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
