दगडी पुल परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांचा हल्ला; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध
रत्नदीप सपकाळे । भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (६ जुलै) रात्री भरवस्तीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दगडी पुल परिसरातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, हल्ल्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिकृत तपासानंतरच गोळीबारामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
