मूळ कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आवाहन; मुदत संपल्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरणार नाही
धुळे | प्रतिनिधी
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या तसेच दीर्घकाळापासून बेवारस अवस्थेत पडून असलेल्या मोटारसायकलींची निर्गती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित वाहन मालकांनी पुढील दोन महिन्यांच्या आत मूळ कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या वाहनांची खात्री करून ताबा घ्यावा, असे आवाहन चाळीसगाव रोड पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दुचाकी वाहनांची बेवारस रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली असून, संबंधित वाहनांचे उपलब्ध नोंदणी क्रमांक व चेसिस क्रमांकाच्या आधारे मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वाहनांची कायदेशीर निर्गती करणे आवश्यक असल्याने संबंधित मालकांनी तातडीने पुढाकार घ्यावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भातील बेवारस मोटारसायकलींची संपूर्ण यादी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या नागरिकांची वाहने या यादीत आहेत, त्यांनी वाहनांची मूळ कागदपत्रे घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, शंभर फुटी रोड, धुळे येथे उपस्थित राहून वाहनांची ओळख पटवावी.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करून संबंधित वाहन मालकांना त्यांची मोटारसायकल परत दिली जाणार आहे.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर वाहनांबाबत कोणतीही तक्रार किंवा दावा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी वेळ न दवडता आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
