विशेष स्कॉड स्थापन करण्याची ॲड. पंकज गोरे यांची मागणी
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील वाढते अवैध धंदे, गुंडगिरी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बिघडत चाललेली कायदा-सुव्यवस्था याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष स्कॉड स्थापन करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
निवेदनात धुळे शहरात सट्टा, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू अड्डे यांसारखे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी जुगार, सट्टा आणि इतर व्यसनांच्या विळख्यात अडकत असून त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
ॲड. गोरे यांनी यापूर्वीही तत्कालीन पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय केराळे यांच्याकडे याच संदर्भात निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक आणि धुळे जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची बदली झाल्याने अपेक्षित कारवाई होऊ शकली नसल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
गुन्हेगारांवर विशेष नजर ठेवण्याची मागणी
गंभीर गुन्ह्यांतील आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप करत अशा आरोपींवर विशेष लक्ष ठेवावे, त्यांची नियमित तपासणी करावी, गुंडांची परेड घेऊन त्यांना तंबी द्यावी तसेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर निर्बंधाची मागणी
सोशल मीडियावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण करणारे व्हिडिओ, हिंसक गाणी आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करावी किंवा निर्बंध घालावेत, अशीही मागणी करण्यात आली.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे
शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक अधिक सक्रिय करावे, छेडछाडीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
“कायद्याचा बालेकिल्ला” धर्तीवर मोहीम राबविण्याची मागणी
नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “कायद्याचा बालेकिल्ला” या विशेष मोहिमेच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातही अवैध धंदे, गुंडगिरी आणि समाजकंटकांविरोधात सातत्यपूर्ण विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी संबंधित बाबींची तपासणी करून आवश्यक ती तातडीची कारवाई करण्याचे आश्वासन ॲड. पंकज गोरे यांना दिल्याची माहिती देण्यात आली.
