अनेक वर्षांपासून स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांची गैरसोय; पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणी, जागा उपलब्ध असूनही काम रखडल्याचा आरोप
धरणगाव | योगेश पी. पाटील । प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील निशाने गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने गावासाठी तातडीने स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी सरपंच मंगलाताई पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सरपंच मंगलाताई पाटील यांनी सांगितले की, या प्रश्नाबाबत यापूर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अनेक वेळा लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच पालधी येथे प्रत्यक्ष भेट घेऊनही स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मागील वर्षीही यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा उपलब्ध असूनही प्रस्ताव मंजूर न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्मशानभूमीला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंच मंगलाताई पाटील यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवाचाही उल्लेख केला. त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्या वेळी काही ग्रामस्थांनी मृतदेह तहसील कार्यालयात नेण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पी. एम. पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ग्रामस्थांची समजूत काढली व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘गाव तेथे स्मशानभूमी’ हा प्रश्न उपस्थित झाला असून ग्रामविकास मंत्री यांनीही याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे सरपंचांनी नमूद केले.
जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आवश्यक अधिकार असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन निशाने गावाची अनेक वर्षांपासूनची ही गंभीर समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी लवकरच ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचेही सरपंच मंगलाताई पाटील यांनी सांगितले.
