सीईओ करिष्मा नायर यांना निवेदन; ‘शुद्ध पाणी द्या, अन्यथा तेच दूषित पाणी प्रशासनाला पाजू’ असा संतप्त इशारा
जगदीश सपकाळे जळगाव तालुका प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील भोकर गावात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडून प्रशासनालाच तेच दूषित पाणी पिण्यासाठी देण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदनानुसार, भोकर ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट एरिया, जुना व नवीन कोळीवाडा, गुजरवाडा, बडगुजरवाडा, दर्जाचा वाडा, कुणबीवाडा, डेबुरवाडा, हरिहर महाराज मंदिर परिसरासह गावातील विविध भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली असून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
दूषित पाण्यामुळे गावात उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो, टायफॉइड आणि काविळसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावातील पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न होणे, मुख्य जलवाहिनी फुटणे, गटारीचे पाणी जलवाहिनीत मिसळणे तसेच टीसीएल किंवा ब्लिचिंग पावडरद्वारे आवश्यक शुद्धीकरण न होणे, ही दूषित पाणीपुरवठ्याची प्रमुख कारणे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शुद्ध पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत ग्रामस्थांना टँकरद्वारे अथवा अन्य माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
यावेळी प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाणे, कविता सोनू बाविस्कर, चंद्रभागा कोळी, समाधान सपकाळे, धनराज वारुडे, सुकदेव बाविस्कर यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
