घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, एमपीडीएतील सराईत गुन्हेगार पुन्हा जाळ्यात
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांना आळा घालत जळगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच अट्टल आरोपींना अटक करून १० गुन्ह्यांची यशस्वी उकल केली असून ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाढत्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर सातत्याने पाळत ठेवून पोलिसांनी कारवाईची मोहीम राबविली.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुरुजीत सिंग सुजानसिंग काली (टोळीचा मुख्य सूत्रधार), दीपक पाटील, राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी यांच्यासह एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपींनी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९ घरफोडी आणि १ वाहनचोरी, असे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये चार मोटारसायकलींसह इतर चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
तपासात मुख्य आरोपी गुरुजीत सिंग सुजानसिंग काली हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, जळगाव तालुका आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करून नागपूर मध्यवर्ती कारागृहातही स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक यशजित येवले तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बडर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे तसेच वाहनचालक पोलीस हवालदार अशोक पाटील आणि पंकज देशमुख यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
