खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन; वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही दिला संदेश
पाळधी / धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून मंदिर उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच मंदिरासाठी आवश्यक सभामंडप उभारण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी)च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला भक्ती, समता आणि सेवाभावाचे संस्कार दिले आहेत. गावातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून गावाच्या एकोप्याचे, संस्कारांचे आणि सामाजिक ऐक्याचे अधिष्ठान असते. मंदिराभोवती माणसे जोडली जातात आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळते. त्यामुळे मतभेद विसरून सर्वांनी गावाच्या प्रगतीसाठी एकदिलाने काम करावे.”
ते पुढे म्हणाले की, खर्दे गावात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर नसल्याची बाब वारकरी मंडळी, सरपंच आणि ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. तसेच सभामंडपासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
असते हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
भूमिपूजनानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जय गुरुदेव माध्यमिक विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून भावी पिढीसाठी हिरवागार आणि समृद्ध वारसा निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ लोकसहभागातून अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी तालुकाप्रमुख गजानन (नाना) पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वारकरी संप्रदायाविषयीच्या आस्थेचा तसेच सामाजिक व धार्मिक कार्यातील योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. डी. पाटील यांनी केले, तर आभार सरपंच कैलास पाटील यांनी मानले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, सरपंच कैलास पाटील, उपसरपंच योगेश पाटील, ह.भ.प. विकास महाराज, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, उमेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील, मंगलाबाई बाविस्कर, प्रियंका कोळी, देविदास पाटील, विशाल पवार, माजी तालुकाप्रमुख गजानन पाटील, हायस्कूलचे चेअरमन वसंतराव भोलाणे, माजी सभापती दीपक सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ, वारकरी, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
